ब्युरो टीम : विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना काय काळजी घ्यावी, करिअरची निवड कशी करावी, अपयश आल्यानंतर खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करीत यशाला गवसणी कशी घालावी, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना करतानाच एकप्रकारे जीवनात यशस्वी कसे व्हावे, याचा कानमंत्रच शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी मधील उद्यमनगर येथील क्रीडा प्रबोधिनी शाळेत आयोजित केलेल्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे. यावेळी जांभळे पाटील यांनी व्यासपीठावर न बसता थेट विद्यार्थ्यांसोबत बसून त्यांच्याशी खेळ, अभ्यास, छंद आणि भविष्यातील संधी आदी विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.
शाळकरी विद्यार्थ्यांचा परीक्षा जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा प्रबोधिनी शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माध्यमिक शिक्षणाधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक जयराम वायळ, क्रीडा प्रमुख ऋषिकांत वचकल, शिक्षक सोनाली पाटील, संग्राम मोहिते, राहुल मोरे, अक्षता बांगर, मनोज राऊत, प्रमिला अल्हाट, दत्तात्रय कोळी, दिनेश राऊत, विजय पाटील, प्रियंका पाटील, गौरी गाडेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, ‘आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लक्ष्य निश्चित करा. आपले क्षेत्र निवडून त्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आपले पालक आपल्याला सांगत आहेत, केवळ म्हणून अभ्यास न करता मनापासून अभ्यास करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. तुमच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करा. विविध खेळांमध्ये सहभागी होऊन क्रीडा क्षेत्रामध्येही तुम्ही चांगले करिअर करू शकता. महानगरपालिका तुम्हाला क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा साहित्य, मैदान उपलब्ध करून देतच आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाच्या खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी देखील खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपल्या शहराला नावलौकिक मिळाले, अशा पद्धतीने क्रीडा क्षेत्रात कामगिरी करावी,' असे आवाहनही त्यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक जयराम वायळ यांनी यावेळी आतापर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीची माहिती दिली.
शाळेतील जुन्या आठवणीनां उजाळा
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यावेळी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘नांदेड सारख्या जिल्ह्यात मी लहानच मोठा झालो. पूर्वी शाळेत बेंच नव्हते. शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी कला शाखेत पदवी घेतली, त्यानंतर डी.एड केले. तीन वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली. परंतु आई सारखी म्हणायची की, काहीतरी वेगळे कर. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यातून सुरुवातीला गट विकास अधिकारी म्हणून काही दिवस काम केले. आज मी आपल्या समोर अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत आहे. सातत्यपूर्ण मन लावून तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे धावलात, तर यश निश्चित मिळते,' असेही त्यांनी सांगितले.
क्रीडा आणि शिक्षण यांचा समतोल राखत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी शाळेच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या शहराचे नाव उंचावणारे खेळाडू घडविण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व क्रीडा प्रशिक्षण आणि उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. आज शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्यामुळे क्रीडा क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्यासाठी आणखी कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे, हे देखील समजले असून त्यादृष्टीने भविष्यात नियोजन करणे शक्य होणार आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडाप्रबोधिनी विद्यालय हे केवळ शैक्षणिक केंद्र नसून खेळाडू घडवण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत खेळाच्या माध्यमातून भविष्यातील संधी प्राप्त होण्यासाठी येथे आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात येतात. त्यामुळे हे विद्यालय अनेक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. आज या शाळेत थेट अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.
- विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा