PCMC : नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद वृद्धिगत होण्यासाठी जनसंवाद सभा उपयुक्त, अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील

ब्युरो टीम : 'पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या  आदेशानुसार जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक व प्रशासन यांच्यातील सुसंवाद वृद्धिगत होण्यासाठी या जनसंवाद सभा उपयुक्त ठरत आहेत,' असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  'ग' क्षेत्रीय कार्यालयात  सोमवारी (२४ मार्च २०२५) जनसंवाद सभा  अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे उप आयुक्त तथा जनसंवाद समन्वयक मनोज लोणकर, ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, कार्यकारी अभियंता झहिरा मोमीन यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ८ क्षेत्रीय कार्यालयात देखील जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अ,ब, क, ड, इ, फ, ह, क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १४, १२, ४, १५, ५, १२, १९ तक्रारी नागरिकांनी सादर केल्या होत्या. तर 'ग' क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या या जनसंवाद सभेत नागरिकांनी १४ तक्रारी मांडल्या.जांभळे पाटील यांनी सर्व तक्रारी ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांची अधिकाऱ्यांकडून माहिती देखील घेतली. याच वेळी .

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा घेतला आढावा

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. यामध्ये कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे,  महानगरपालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकणे,  नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे,  महानगरपालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणे, त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे,  अशा विविध बाबींवर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने देखील अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली. यावेळी नागरिकांसाठी  पिण्याच्या पाण्याची सोय, बैठक व्यवस्था, प्रत्येक विभागाच्या नावाच्या पाट्या आदी कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना जांभळे पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

नागरिकांच्या तक्रारी कमीत कमी कालावधीत सोडवण्यासाठी जनसंवाद सभा उपयुक्त ठरत आहेत. नागरिकांचा देखील या जनसंवाद सभेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी अशा जनसंवाद सभा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच क्षेत्रीय कार्यालयात घेण्यात येत आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले आहे.

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने