ब्युरो टीम: देशामध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ही स्पर्धा सुरू असून यामध्ये पिंपरी चिंचवड शहर सहभागी झाले आहे. या स्पर्धेत नागरिकांच्या अभिप्राय महत्त्वाचे असून त्यास अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या पिंपरी चिंचवड शहराला अव्वल आणण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपला स्वच्छतेविषयक अभिप्राय द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ला सामोरे जाताना जोरदार तयारी केली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेविषयक विविध कृतीशील उपक्रम देखील राबवले आहेत. तसेच ओला, सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, कापडी पिशव्यांचा वापर या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर देखील महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात आला आहे.
याशिवाय पिंपरी चिंचवड शहराला स्पर्धेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी शहरातील नागरिकांचे अभिप्राय देखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' च्या अनुषंगाने अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.
मोबाईल ॲप द्वारे नोंदवता येणार अभिप्राय:
- गूगल प्ले स्टोअर वरून ‘SS2024 VoteForYourCity’ हे ॲप डाऊनलोड करा.
- त्यानंतर स्वतःचा मोबाईल क्रमांक टाका आणि पसंतीची भाषा निवडा.
- ‘राज्य’ या पर्यायात ‘महाराष्ट्र’ आणि ‘जिल्हा’ या पर्यायात ‘पुणे’ निवडा
- युएलबी पर्यायात ‘पिंपरी चिंचवड’ निवडा
- त्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या प्रश्नांचे योग्य उत्तर द्या
- तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी टाकून अर्ज सबमिट करा.
- याशिवाय नागरिक त्यांचा अभिप्राय https://sbmurban.org/feedback या संकेतस्थळावर नोंदवू शकता.
देशभरात घेतल्या जाणाऱ्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' या स्पर्धत पिंपरी चिंचवड शहराला देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी त्यांचा स्वच्छतेबाबतचा अभिप्राय नोंदवावा. कारण नागरिकांच्या अभिप्रायासाठी राखीव गुण ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने हा अभिप्राय नोंदवता येईल.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ स्पर्धेच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेविषयक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास भर दिला आहे. आता नागरिकांनी जास्तीतजास्त अभिप्राय नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला अव्वल आणण्यासाठी सहकार्य करावे.
- सचिन पवार, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा