Pune :पुण्यातील एका तरुणाचा उद्दामपणा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कठोर भूमिका


ब्युरो टीम : पुण्यात सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये एका तरुणाने मुख्य चौकात अश्लील हावभाव करत लघुशंका केल्याचे दिसत आहे. या प्रकारावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका गाडीतून उतरून मुख्य चौकात हा तरुण लघुशंका करतो. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी विरोध केला, तरीही त्याने उद्दामपणा केला. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रकरणी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "ही घटना केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या बेशिस्त आणि मुजोर वर्तनाची समस्या वाढत चालली आहे. पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. पोलिसांनी आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे."

त्या पुढे म्हणाल्या, "अशा घटना घडतात कारण काही पालक आपल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यावर पांघरूण घालतात. हे थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, पोलीस आणि सरकारने एकत्रितपणे कठोर भूमिका घेतली पाहिजे."

शहराच्या सुरक्षिततेसाठी मोहिम राबवण्यासंदर्भात सूचना

या घटनेतील तरुणाचा तपशील पोलिसांना मिळाला असून, लवकरच त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी दिली. तसेच, पुणे शहरातील रस्त्यांवरील सर्व सीसीटीव्ही मार्च महिन्यात कार्यान्वित होतील, मात्र पोलिसांना या घटनेचे फुटेज मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील वाढत्या अशा घटनांवर आळा घालण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचना त्यांनी दिली. "राजकीय श्रेयवाद न खेळता सर्वांनी मिळून समाजात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. सरकारने पोलिसांना अधिक स्वायत्तता द्यावी आणि नागरिकांनीही जबाबदारीने वागावे," असे आवाहनही त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने