Ramdas Athawale : सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना निलंबित, मंत्री रामदास आठवले यांची मोठी मागणी

 

ब्युरो टीम : दलित पॅथर चळवळीचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविता 'चल हल्ला बोल’ या चित्रपटात वापरण्यात आल्या आहेत. जेव्हा हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला तेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या कवितांवर आक्षेप घेतला होता. तसेच त्यांना या नामदेव ढसाळ यांच्या कविता असल्याचे सांगताच त्यांनी ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असा प्रश्न उपस्थित केला होता. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेला प्रश्न पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या संबंधित आपली भूमिका व्यक्त करताना सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

मंत्री आठवले यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करीत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की,' दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ हे  जागतिक दर्जाचे महाकवी होते.क्रांतिची प्रेरणा देणारे त्यांचे साहित्य अजरामर आहे. त्यांना ओळखत नाही म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना निलंबित केले पाहिजे आणि नामदेव ढसाळ यांच्यावरील हल्ला बोल या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र दिले पाहिजे,' असेही मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण?

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने