ब्युरो टीम : 'महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या विचारांचा वारसा घेऊन वारकरी काम करतात. माणसाचे कल्याण साधण्याचे आणि सुखदुःखासाठी जगण्याचा मंत्र देण्याचे काम वारकरी करतात. समाज एकसंघ ठेवण्याचे काम संत, वारकऱ्यांनी केले आहे,' असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डी येथे सुरुवात झाली. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प.माधवमहाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प चकोर महाराज बावीस्कर आदी उपस्थित होते.
'संत, वारकरी नसते तर समाज व्यवस्था टिकली नसती. माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे मोठे काम वारकऱ्यांनी केले आहे. वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. समाजातील कुप्रवृत्ती बाजूला नष्ट करण्यासाठी संत, वारकऱ्यांनी समाजप्रबोधन व संस्काराचे काम प्रभावीपणे करावे, असे आवाहनही आठवले यांनी केले.
दरम्यान संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी श्री.साईबाबा समाधी मंदिर ते संमेलनस्थळ शेती महामंडळ मैदानापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्व रिंगणाने करण्यात आली. दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनास राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी व संत अभ्यासक उपस्थित झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा