विक्रम बनकर, अहिल्यानगर : शेतकऱ्याच्या टॅक्टरसह इतर वाहने चोरणारी सराईत टोळी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन आरोपीकडून चोरीच्या दहा वाहनासह २५ लाख ४० हजारांचा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. समाधान देविदास राठोड (वय २५, रा.बोलकी कोपरगाव, ता.कोपरगाव हल्ली रा.बोल्हेगाव फाटा, अहिल्यानगर), दादासाहेब दिलीप बावचे (वय २८, रा.सावळीविहीर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) आणि बाबा उर्फ आकाश रमेश बर्फे (वय २४, रा.तिनचारी, कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत. उभा आरोपींनी अहिल्यानगर, छ.संभाजीनगर, नाशिक, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहन चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीचे ना उघड गुन्हयांचा समांतर तपास करून, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रणजीत जाधव, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुन अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पहा व्हिडिओ : मुंबईत फुटपाथ व फ्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या मुलांना हक्काचे घर देणारा सदाशिव!
१९ एप्रिल २०२५ रोजी पथक अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे समाधान देविदास राठोड ( रा.बोलकी कोपरगाव, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर) हा त्याचे साथीदारासह वाहन चोरीचे गुन्हे करत असून चोरीचे वाहन व मोटार सायकल विक्रीसाठी एमआयडीसी परिसर, अहिल्यानगर येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीवरून पथकाने एमआयडीसी बायपास परिसर, अहिल्यानगर येथे सापळा रचुन आरोपींचा शोध घेत असताना काही संशयीत इसम पांढरे रंगाची इरटिगा गाडी व मोटार सायकल असे थांबलेले दिसुन आले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष संशयीत इसमांना ताब्यात घेत असताना दोन इसम पळून गेले. पथकाने घटनाठिकाणावरून आरोपी समाधान देविदास राठोड, दादासाहेब दिलीप बावचे, बाबा उर्फ आकाश रमेश बर्फे अशांना ताब्यात घेतले.
पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे त्यांचे ताब्यातील मोटार सायकल व इरटिगा क्रमांक (एमएच ०४ जीएन ५७७७) बाबत विचारपूस केली असता आरोपी दादासाहेब दिलीप बावचे याने इरटिगा गाडी माझे मालकीचे असून तिचा वापर आम्ही कोल्हार येथे मोटार सायकल चोरी करताना केला असल्याची माहिती दिली. तसेच आरोपीतांनी आणखी काही वाहने चोरी केलेबाबत विचारपुस केली असता त्यांनी चोरी केलेले दोन ट्रॅक्टर, दोन ऍ़क्टीवा व एक पल्सर असे वाहने एमआयडीसी बायपास रोडलगत ठेवलेल्या आहेत, अशी माहिती सांगितली.
त्यावरून पथकाने पंचासमक्ष आरोपीतांकडून २५ लाख ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये १ मारूती सुझुकी कंपनीची इरटिगा, १ होंडा कंपनीची युनिकॉर्न, २ इनफिल्ड कंपनीची बुलेट, ३ होंडा कंपनीची ऍ़क्टीवा, १ जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर, १ स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, १ पल्सर मोटार सायकल असे एकुण १० वाहने हस्तगत केले आहेत. ताब्यातील आरोपीतांना मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन गुरनं 135/2025 बीएनएस 303 (2) या गुन्हयाचे तपासकामी लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन, गुन्हयाचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा