Ahilyanagar : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न

ब्युरो टीम : वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असतांना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी  विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. नितीन दानवले आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, हवामान बदलांना तोंड देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करून, सेंद्रिय शेती, समग्र अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रसार करून कृषी विद्यापीठे हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यात आणि  उत्पादकता वाढवण्यात मदत करू शकतात. कृषी पदवीधरांनी स्थानिक घटक लक्षात घेऊन पिकांचे वाण विकसित करावे. विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि अचूक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक माहिती पुरविणे गरजेचे आहे. कृषी प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन आणि कृषी मूल्य साखळी विकसित करणेही महत्वाचे आहे.

अधिक उत्पन्न देणारी आणि पोषणमूल्यांनी भरलेली पिके विकसित करणे हे कुपोषणाला थोपवण्यासाठी आणि अन्न व पोषण सुरक्षेची हमी देण्यासाठी अत्यावश्यक आहे. नवोपक्रम, शिक्षण आणि शाश्वत पद्धतींच्या माध्यमातून भारतीय शेती तिच्या अडचणींवर मात करून यशस्वी होऊ शकते. कृषी पदवीधरांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्याने या आव्हानांना सामोरे जाऊन आधुनिक कृषी पद्धती विकसित करावी अशी अपेक्षा श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली.

राज्य शासन शेतीतील नवोपक्रम, उद्योजकता आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारे परिसंस्थेचे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आर्थिक सहकार्य , प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या विविध कार्यक्रमांद्वारे शेती क्षेत्रातील पुढील नेतृत्व घडविण्याचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. कृषी क्षेत्राची आणि विद्यापीठाच्या गरजा लक्षात घेण्यासाठी तीन दिवस विद्यापीठात मुक्काम करणार असल्याचे श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध पिकांच्या जाती आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे  प्रशंसनीय कार्य केले आहे. डिजिटल शेतीच्या क्षेत्रात विद्यापीठाची झालेली प्रगती ही एक भूषणावह बाब आहे. विद्यापीठाचा हा पुढाकार शेतकरी समुदायापर्यंत  विकसित झालेली तंत्रज्ञान आणि माहिती सहज आणि आकर्षक पद्धतीने पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले.

संशोधन, शिक्षण व विस्तारामध्ये विद्यापीठाने योगदान द्यावे-अ‍ॅड.कोकाटे

कृषी मंत्री  अ‍ॅड.कोकाटे म्हणाले,  वातावरणतील बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम होतं आहे. यावर मत करण्यासाठी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करून नावे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. कमी खर्चात नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न करावे लागतील. नव्या कल्पना, नैसर्गिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून  शेती पद्धतीत बदल घडवून आणावे लागतील. फलोत्पादन आणि उत्तम गुणवत्तेचे उत्पादन करून निर्यातीवर भर देणेही गरजेचे आहे. 

विद्यापीठाने  संशोधन, शिक्षण व विस्तारामध्ये भरीव योगदान द्यावे आणि कृषी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी करावा असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले. राज्य शासन विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायमच कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

कृषी स्नातकांनी नाविन्याचा पर्याय निवडावा-डॉ. संजय कुमार

डॉ. संजय कुमार म्हणाले,  कृषी उद्योजकतेला आणि कृषी पर्यटणाला चालना देण्याची गरज आहे. कृषी स्नातकांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निर्भयपणे नाविन्याचा पर्याय निवडावा. कार्यक्षम अशी मूल्य साखळी तयार करावी, कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमॅन्युफॅक्चरिंग हब तयार करावे. कृषी उत्पादनाच्या ब्रॅण्डिंगला प्रोत्साहित करावे. बाजारपेठेत प्रवेशासाठी विविध आउटलेट किंवा कृषी उत्पादनांचे मॉल तयार करावे.  सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी योगदान देण्याचे  आणि अन्न सुरक्षेसोबत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कृषी आधारित क्षेत्रात महाराष्ट्राचा १३ टक्के वाटा असून ऊस, कापूस, द्राक्ष, डाळी आणि आंबा उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र दुष्काळ, पाण्याचे दुर्भीक्ष आणि असामान्य पर्जन्यमान सारख्या समस्यांना राज्याला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर हवामान-प्रतिरोधक पिकांची निर्मिती, पाण्याचा कार्यक्षम वापर निश्चित करण्यासह प्रगत कृषि पद्धतींचा प्रचार करून या आव्हानांना सामोरे जाण्यात महत्त्वाची भूमिका महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ.गडाख यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. ते म्हणाले, विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या १ हजार ८६६ तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या ३११ वाणांची निर्मिती आणि ५१ कृषी अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या  ऊस, डाळिंब, हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा, भात, लिंबू व बाजरी  या  प्रमुख ८ पीकांच्या वाणांचे आर्थिक विश्लेषण केले असता या ८ पिकांच्या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकुण २ लक्ष ४० हजार १८८  कोटी व निव्वळ ३२ हजार २० कोटी रुपये इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. विद्यापीठाने कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी विविध नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण ५ हजार २०१ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात आले. त्यात विविध विद्याशाखातील ४ हजार ८३० स्नातकांना पदवी, ३३१ स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर ४० स्नातकांना आचार्य पदवी संपादन केली आहे. यावेळी

पीएच.डी.च्या ८ विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या १९ विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण व दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदके प्रदान करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्री. पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला यांच्यासह विद्या परिषदेचे सदस्य व स्नातक यावेळी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने