विक्रम बनकर, अहिल्यानगर : काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात नुकत्याच घडलेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध शहरातील मुस्लिम समाजाकडून करण्यात आला. या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप 26 नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत मुस्लिम बांधवांनी माणुसकीसाठी एकतेचा संदेश दिला.
शुक्रवार, दिनांक 25 एप्रिल रोजी सर्जेपूरा येथील तांबोळी कब्रस्तान मरकज येथे नमाज अदा केल्यानंतर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित नागरिकांनी काळ्या फिती लावून दहशतवादाविरोधात संताप व्यक्त केला.
या सभेला अब्दुल सलाम खोकर, हाजी मन्सूर शेख, मौलाना अफजल, हाजी अकिल शेख, हाजी रऊफ टायरवाले, हामजा शेख, शाहरुक शेख, अब्दुल रहेमान सौदागर, आसिफ शेख, साजिद शेख, रफिक वेल्डर यांच्यासह मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेमध्ये बोलताना अब्दुल सलाम खोकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. तो माणुसकीचा शत्रू आहे. बायसरनमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानवजातीच्या विरोधात असून, अशा प्रवृत्तींचा नायनाट होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी."
हाजी मन्सूर शेख यांनी सांगितले, "इस्लाम हा शांती, प्रेम आणि सहिष्णुतेचा धर्म आहे. दहशतवादाचे समर्थन कुठल्याही धर्मात होत नाही. अशा कृत्यांमुळे मानवतेची हानी होते आणि त्यामुळे संपूर्ण समाज भयभीत होतो."
श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून मुस्लिम समाजाने दहशतवादाविरुद्ध एकजूट दर्शवली व पीडित कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त करत संपूर्ण देशातील नागरिकांनी अशा प्रवृत्तीविरोधात एकत्र यावे, असं आवाहन केलं.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा