AI technology : कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराने जनसंपर्क क्षेत्रातील कामे प्रभावीपणे करावीत- ब्रिजेश सिंह


ब्युरो टीम :
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआय, चॅटजीपीटी, कॅनव्हा आदी सगळी साधने आहेत, याचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई विभागाच्यावतीने प्रेस क्लब ऑफ इंडिया, मुंबई येथे आयोजित "कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर : जनसंपर्काची भूमिका" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिथी वक्ते द इकॉनॉमिक टाईम्सचे कार्यकारी संपादक मुकबिल अहमर, इंडियन ऑइलच्या मुख्य महाव्यवस्थापक तथा पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई विभागाच्या अध्यक्ष अनीता श्रीवास्तव, कॉर्पोरेट अफेअर्स इंड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेडचे संचालक तथा पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई विभागाचे उपाध्यक्ष राजेश परिडा, सचिव डॉ. मिलिंद आवताडे, खजिनदार अमलान मस्कारेनहास, मुंबई विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्राध्यापिका दैवता पाटील, जनसंपर्क आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच मुंबई विद्यापीठातील मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले, जरी ‘एआय’ला मानवी भावना समजत नसल्या तरीही, भावना विश्लेषण आणि प्रतिक्रिया संकलनात त्याची कार्यक्षमता खूप आहे. तंत्रज्ञान सतत बदलतंय. जो नवीन गोष्टी शिकत राहतो, तोच टिकतो. त्यामुळे आज ‘एआय’ आहे, उद्या दुसरं काही येईल, पण तुम्ही शिकण्याची आणि जुळवून घेण्याची वृत्ती ठेवली, तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. ‘एआय’ आणि चॅटजीपीटी सारख्या तंत्रज्ञानांनी खरंच खूप मोठा बदल घडवून आणलाय. जिथे पूर्वी मानवी मेंदूची गरज असायची, आज तिथे मशीन हे काम करतंय आणि बऱ्याच वेळा ते अधिक जलद, अधिक अचूक पद्धतीनं करतंय. पण यातून घाबरण्यापेक्षा शिकण्याची आणि स्वतःला नव्यानं सिद्ध करण्याची गरज आहे. कारण कोणतंही यंत्र मानवी कल्पकतेशी, अनुभवाशी आणि सहानुभूतीशी स्पर्धा करू शकत नाही. भाषांतर करणे, लेख लिहणे, व्हीज्युअल तयार करणे, अहवाल तयार करणे असो  किंवा कोणत्याही भाषेत सोशल मीडियासाठी पोस्ट्स बनवणे असो ‘एआय’ लगेच करू शकतं असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता एक वेगळेच पाऊल आहे. कारण पहिल्यांदाच एखाद्या तंत्रज्ञानाला निर्णय घेण्याची क्षमता आहे. संगणक टायपरायटरची जागा घेऊ शकतो, पण तो मानवी आदेशावर चालतो. ‘एआय’ मात्र स्वतः शिकतो आणि निर्णय घेतो. जगातील ६० देशांनी राष्ट्रीय एआय धोरण तयार केले आहे, असे द इकॉनॉमिक टाईम्सचे कार्यकारी संपादक मुकबिल अहमर  यांनी सांगितले.

‘एआय’वर १४२ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे, पुढच्या काही वर्षांत ती २०० अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे. तसेच ५५ टक्के कंपन्यांकडे एआय बोर्ड आहे, आणि ५४ टक्के कंपन्यांकडे मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी या पदावर काम करणारे अधिकरी आहेत. हा फक्त ट्रेंड नाही, हे तर क्रांती आहे. एआय सर्व क्षेत्रांत बदल घडवत असल्याचे श्री. अहमर यांनी यावेळी सांगतिले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने