ब्युरो टीम : अमरावती जिल्ह्यातील मासोद येथे ७ एप्रिल रोजी दूषित पाण्यामुळे रोगाची लागण झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बाधितांच्या घराशेजारील आणि मुख्य पाण्याच्या स्रोताचे जैविक नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे मासोदमधील आरोग्य स्थिती नियंत्रणात आली आहे.
मासोद गावातील एकूण २०२ घरे आणि ९२५ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. बाधितांवर चांदूरबाजार येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील १० रुग्णांपैकी ६ जणांना उलट्या आणि जुलाब, तर ४ जणांना कोणतेही लक्षण नसताना दाखल करण्यात आले. रूग्णांनी ७ एप्रिलच्या संध्याकाळी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घरी जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर गावात ८ एप्रिलपर्यंत उलट्या किंवा जुलाबाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. प्रशासनाने विलगीकरण कक्ष स्थापन करून आवश्यक औषधसाठा उपलब्ध केला आहे. गावात नियमित सर्वेक्षण सुरू असून वैद्यकीय कर्मचारी सतत कार्यरत आहेत. बहुउद्देशीय पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत वितरित होणाऱ्या टँकरमधील पाण्याची तपासणी केली जात असून पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच जलसाठा उपलब्ध केला जात आहे.
बाधित व्यक्तींच्या घरी आरोग्य कर्मचारी नियमित भेट देत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गावात दवंडीच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती केली जात आहे. सध्या गावाची परिस्थिती नियंत्रणात असून एकही रुग्ण नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा