ब्युरो टीम :उन्हाळा सुरू होताच अनेक घरांमध्ये एसीचा वापर सुरू होतो. उकड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण दिवस-रात्र AC चालू ठेवतात. काहीजण तर वर्षभर AC वापरतात. पण सतत AC वापरणं आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं, हे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊया यामागील कारणं:
एसीचा अतिवापर आरोग्यासाठी घातक
वेबएमडीच्या माहितीनुसार, सतत बंद AC वातावरणात राहिल्यास व्हेंटिलेशनचा अभाव निर्माण होतो. यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजार होऊ शकतात. म्हणून वेळोवेळी AC फिल्टर बदलणे, खिडक्या उघडून ताजी हवा घरात येऊ देणे आवश्यक आहे.
डिहायड्रेशनची समस्या
AC सतत सुरू ठेवल्याने हवेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि शरीरातील पाण्याची कमतरता होते. परिणामी चक्कर येणे, थकवा यासारख्या समस्या होऊ शकतात.
डोळ्यांना त्रास
घरातील ओलावा कमी झाल्यामुळे डोळे कोरडे पडतात. यामुळे डोळ्यांना खाज, चिडचिड, आणि सतत पाणी येणे यांसारखे त्रास होऊ शकतात. वेळेवर उपाय न केल्यास डोळ्यांचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
श्वासोच्छवासाच्या अडचणी
AC मध्ये दिवसभर राहिल्याने काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. ब्लॉक नाक, दमछाक आणि श्वसनमार्गाचे विकार अधिक प्रमाणात दिसून येतात.
डोकेदुखी व मायग्रेन
AC वापरल्याने अनेकदा डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होतो. विशेषतः जर AC फिल्टर स्वच्छ नसेल तर तो हे लक्षण अधिक वाढवतो.
उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होते
ACमध्ये सतत राहत असाल, तर उष्णतेच्या बदलाशी जुळवून घेण्याची शरीराची क्षमता कमी होते. त्यामुळे ACमधून बाहेर पडल्यावर थकवा, अस्वस्थता जाणवते.
अॅलर्जीची शक्यता
AC चे योग्य वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यास त्यात बुरशी, जीवाणू आणि धूळ साचते. यामुळे मायक्रोबियल अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो.
खरतर ACचा योग्य वापर आणि नियमित देखभाल केल्यास तो उपयोगी ठरतो. मात्र, रात्रभर किंवा सतत ACमध्ये राहणं आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतं. म्हणूनच, योग्य व्हेंटिलेशन, फिल्टर साफसफाई आणि गरजेनुसार ACचा वापर करणे आवश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा