ब्युरो टीम : कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्नात उधळपट्टी करतात अशा आशयाचे विधान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम म्हणून शेतकरी किती अडचणीत आहेत, याची काडीची जाणीव नसल्यानेच कृषिमंत्र्यांनी असे विधान केले आहे, अशी भूमिका किसान सभेने मांडली आहे.
सरकारच्या धोरणांमुळे शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे. सरकार मतांच्या राजकारणासाठी शेतीमालाचे भाव सातत्याने पाडत असल्याने शेतीतील तोटा वाढतो आहे. शेतकऱ्यांना यामुळे हंगाम उभा करण्यासाठी सातत्याने कर्ज घ्यावे लागते. प्रत्येक हंगाम तोट्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत राहतो. त्यातच भर म्हणजे सरकारने कॉर्पोरेटधार्जिणे नियम केल्याने नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना भरपाईपासून दूर राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्णपणे रसातळाला जाते.
सरकारच्या या धोरणाकडे कानाडोळा करून माणिकराव कोकाटे सारखी माणसे अशी विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली होती. अशा उथळ व सहिष्णुता नसलेल्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होत असून लोकांना अशी माणसे निवडून दिल्याचा पश्चाताप होत आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त केले पाहिजे, असे किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा