Kolhapur : नागरिक सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक व्हाव्यात,विभागीय आयुक्त डॉ पुलकुंडवार


ब्युरो टीम :कोल्हापूर जिल्ह्यात सद्या सुरु असलेल्या चांगल्या कामात सातत्य ठेवून नागरिकांना प्रशासनाबरोबरच्या कामांमध्ये सकारात्मक बदल दिसावेत. यातून नागरिक सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक करा अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात शंभर दिवसांचा कृती आराखडा व इतर महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विभाग प्रमुखांचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला. नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवताना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या तक्रारींचे निवारण, तसेच शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्यात आला. नागरिकांचे जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी नाविण्यपुर्ण उपक्रमातून शासनाच्या कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करा अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या. 

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, शासनाच्या योजनांचा खरा लाभ अंतिम टप्प्यावरील नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यांनी डिजिटल प्रणालींचा अधिकाधिक वापर, तक्रारींचे तातडीने निराकरण, आणि सेवा वितरणामध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, यांचेसह इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील प्रगतीचा आढावा देताना येणाऱ्या अडचणी आणि उपाय योजनांची माहिती दिली.

शासनाने सर्वसामान्यांना अधिक चांगल्या प्रकारे शासकीय सेवा आणि योजना मिळाव्यात यासाठी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून नागरिकांना प्रशासकीय पातळीवर बदल झालेले दिसावेत. त्यांच्याकडून प्रत्येक कार्यालयाबाबत सकारात्मक प्रतिक्रीया मिळतील असे बदल अपेक्षित आहेत. याचबरोबर केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून येत्या काळात स्वच्छतेवर भर देण्यात यावा असेही ते म्हणाले. बैठकीपुर्वी विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांचे स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुस्तिका भेट देऊन केले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने