ब्युरो टीम: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कोल्हापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत दि. १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत समता पंधरवडा निमित्ताने जात पडताळणी पंधरवड्याचे तसेच सामाजिक न्याय पर्व दिनांक ११ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत जात पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी दिली आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित होते व पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेंतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET), जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (JEE), नॅशलन इलिजिबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET), ग्रॅज्युएट ॲप्टीट्युड टेस्ट इन इंजिनिअरींग (GATE), नॅशनल ॲप्टीट्युड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व ज्यांनी अद्यापपर्यंत जात पडताळणी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सादर केलेले नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी bartievaldity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा व हा अर्ज ऑफलाईन पध्दतीने मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह सर्व मूळ कागदपत्रांसह दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत समितीकडे सादर करावा.
ज्या अर्जदारांनी समितीकडे यापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत व ज्यांना समितीमार्फत त्रुटी बाबत ई-मेल द्वारे, एसएमएस द्वारे किंवा पत्राद्वारे कळविण्यात आले आहे अशा अर्जदारांनी समिती कार्यालयात सर्व मुळ कागदपत्रांसह, मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह ऑनलाईन पध्दतीने तसेच समक्ष कार्यालयात उपस्थित राहून १५ दिवसांच्या आत त्रुटींची पुर्तता करावी व या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा