Kolhapur :केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती द्या,जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश


ब्युरो टीम :  शासनाच्या सर्व विभागांनी केंद्र सरकारच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीला गती देऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा. तसेच आपापल्या विभागाच्या वतीने केलेल्या कामांची माहिती येत्या दोन दिवसात जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे  रुग्णालय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिला टप्प्यातील निधी वेळेत खर्च करा. गरजूंना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक लाभार्थ्यांच्या नोंदणी वर भर द्या कोल्हापूर आणि इचलकरंजी मध्ये लवकरात लवकर ई-बस सुरु होण्यासाठी प्रयत्न करा. तसेच अमृत योजनेअंतर्गत एसटीपी प्रकल्प गतीने मार्गी लावा. डिसेंबर 2025 पर्यंत जिल्ह्यातील शंभर टक्के शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी चोख नियोजन करा. तसेच ग्रामपंचायत व नगरपालिकांचे सदस्य शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या घरामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी तसेच अधिकाधिक नागरिकांना सूर्यघर योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा. ई केवायसीचे काम आठ दिवसात पूर्ण करा. स्वामित्व योजनेअंतर्गत नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्या. प्रधानमंत्री जन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व मुद्रा योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून द्या. जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि विमानतळासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया गतीने राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिल्या.

केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. विविध योजनांसाठी प्राप्त निधी वेळेत खर्च करा. केंद्र सरकारकडे प्रलंबित असणारे प्रस्ताव गतीने मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करा. तसेच "केंद्र शासनाशी सुसंवाद" कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांसाठी शासनाने दिलेल्या निकषानुसार आवश्यक मुद्द्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ सादर करा, असे त्यांनी सांगितले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, केंद्र व राज्य शासनाशी समन्वय साधून प्रलंबित विषय मार्गी लावणे व शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या अनुषंगाने आवश्यक विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. सीपीआर रुग्णालय, सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या योजनांशी संबंधित झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने