ब्युरो टीम : मध्यप्रदेशात चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पांतर्गत निर्माण झालेली पाण्याची तुट भरुन काढण्यासाठी आपण सात उपसा सिंचन योजनांना मान्यता दिली आहे. या पाणी तुटीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाय योजनांना शासनाने दुष्काळ निवारण कार्यक्रमात मान्यताही दिली आहे. असे असतांना या कामाला गती मिळणे अपेक्षित होते. याचबरोबर जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्या प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभ क्षेत्रातील शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी का पोहचत नाही असा उद्विग्न सवाल राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
नागपूर येथील नियोजन भवन येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता रवी पराते, अधीक्षक अभियंता सोनाली चोपडे, कार्यकारी अभियंता केतन आकुलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पेंच प्रकल्पाच्या 40 टक्के लाभ क्षेत्रात पाणी पोहचत नाही. या प्रकल्पाच्या टेलवर अडचण आहे. अनेक शेतकरी व ग्रामस्थ याबाबत सातत्याने शासनाला विनंत्या करीत आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पेंच प्रकल्पांतर्गत सात उपसा सिंचन योजनांना गती दिली जाईल. मात्र ज्या क्षेत्रात, गावात पाणी पोहचत नाही अशा गावांचा सर्वे करुन नेमक्या किती व कोणत्या गावात पाणी पोहचत नाही याची वस्तुस्थितीदर्शक पाहणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन अधिकाऱ्यांना दिले.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेची जोड दिली आहे. जिल्ह्यातील काटोल, नरखेड या दोन तालुक्यात पाण्याची पातळी खुप खोल गेली आहे. भविष्यातील पाणीप्रश्नचा आवाका लक्षात घेता पाणीटंचाई अंतर्गत विहिर पुर्नभरण कामांवर भर, जेवढ्या गावांसाठी नळयोजना आहेत त्या नळयोजनांच्या पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण यावर भर देण्यास त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या ऑनलाईन सुविधेसाठी संवाद सेतू ॲपचा क्रमांक कार्यान्वित
प्रशासकीय पातळीवरील नागरिकाच्या असलेल्या विविध सेवा व सुविधा सुलभ पध्दतीने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने व्हॉटस्ॲप चॅटबोट क्रमांक जाहिर केला. आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने हा एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याला आपल्या शेजारील अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने राबविलेल्या विशेष उपक्रमाची जोड देऊन ही सुविधा अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
ऑप्टीक फायबर केबलपेक्षा वायरलेस सिसिटिव्ही कॅमेरांवर भर द्या
नागपूर महानगराच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सिसिटिव्ही कॅमेरांपैकी अनेक ठिकाणची कॅमेरे केबलची जोडणी निघाल्याने उपयोगात येत नाहीत. विविध ठिकाणी रस्ते व इतर कामांमुळे या कॅमेरांना जोडणारी केबल प्रणाली वेळोवेळी जर तुटल्या जात असतील तर त्यापेक्षा नागरिकांचा सहभाग घेऊन मोक्याच्या ठिकाणी वायरलेस सिसिटिव्ही कॅमेरे लावलेले उचित ठरेल. याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व पोलीस विभागाला दिले.
नागरिकांच्या जीवीताचे व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे त्यादृष्टीने अधिकाधिक दक्ष राहण्यासह सिसिटिव्हीचा प्रभावी उपयोग व्हावा, असे ते म्हणाले.
या बैठकीत हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथील कार्यक्रम, सुरक्षा आढावा, शासकीय मुद्रणालय व ग्रंथालय स्थानांतरण, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, सामाजिक न्याय विभागांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कन्यादान योजनेचे अनुदान, छत्रपती शिवाजी महाराज चषक, पुरुष व महि ला कबड्डी स्पर्धा यांचे नागपूर येथे आयोजन, मौदा येथे तालुका क्रीडा संकुलाची नव्याने उभारणी आणि कामठी नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला.
टिप्पणी पोस्ट करा