ब्युरो टीम : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त नागपूर येथील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय व बार्टी प्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामाजिक समता सप्ताह’ अंतर्गत मानेवाडा येथील पिरॅमिड अकॅडमीमधे विद्यार्थ्यांना करिअर आणि कायदेविषयक मार्गदर्शन नुकतेच करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. सुरेखा बोरकुटे, बार्टीचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, पिरॅमिड अकॅडमीचे संस्थापक डॉ. जयंत गणवीर, संगीता गणवीर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. खुशाल ढाक यांनी प्रास्ताविकेत सामाजिक समता सप्ताहामागची भुमिका विशद केली. कार्यक्रमाच्या उद्घाटनीय सत्रात ॲड. सुरेखा बोरकुटे यांनी विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीसाठी जन्म, जात, रहिवासी दाखल्यावरील माहिती अचूक असण्यासंदर्भात खबरदारी घ्यायला सांगितली. व्यसन आणि कुसंगत ही गुन्हाची सुरवात असते. त्यापासून विद्यार्थ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. कुठल्याही गुन्हात न फसण्याबाबत मार्गदर्शन केले. सायबर क्राईमपासून बचावाबाबत माहिती दिली. याप्रसंगी डॉ. जयंत गणवीर यांनी पिरॅमिड ट्युटोरीयलच्या माध्यमतून यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती दिली.
याप्रसंगी तुषार सुर्यवंशी यांनी महात्मा ज्योतिबाच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगीतले. विद्यार्थ्यांना तेव्हाच्या आणि आताच्या शैक्षणिक धोरणाविषयी तुलनात्मक माहिती देत प्रबोधन केले. मनोगतात अनील वाळके यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक धोरणाबाबत माहिती दिली. बार्टीचे शैक्षणिक उपक्रम आणि योजनाबाबत माहिती देत अधिकाधिक विद्यार्थांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अभिजित निमगडे या विद्यार्थ्यांनी ज्योतिबांवरील आपले उत्स्फूर्त विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शीतल गडलिंग यांनी तर आभार सलमान शेख यांनी मानले. या शिबीरास मोठ्या संख्येनी विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा