Nashik : नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी विविध कामांची केली पाहणी


ब्युरो टीम : नाशिक महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत सुरु असलेल्या गंगापुर धरण ते बारा बंगला पाईपलाईन प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी विविध प्रगतीशील कामांचे निरीक्षण करून आवश्यक सुचना दिल्या.

यावेळी आयुक्त खत्री यांनी हेडवर्क परिसरातील प्रगतीशील कामांचा आढावा घेतला. 2.0 द.ल.लि. क्षमतेच्या बॅक प्रेशर टॅंकच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच अस्तित्वातील हेडवर्कच्या निरीक्षणानंतर मृतसाठा उपसा करण्यासाठी आवश्यक कामे लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रस्तावित लोखंडी पाईपलाईन अलाईनमेंटची तपासणी करून धरणाच्या समांतर पाईपलाईन टाकण्यासाठी जलसंपदा विभागाची आवश्यक ना हरकत आणि परवानगी मिळवण्याचे निर्देश दिले.

शंकर पाटील चौक ते बळवंत चौक याभागात जुन्या पाईपलाईनवर (Chairs) बांधून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम योग्य असल्याचे प्रतिपादन केले. तसेच डी पी रोडच्या क्रॉसिंगसाठी नवीन पाईपलाईन जमिनीत टाकण्याच्या सूचनाही दिल्या. प्रस्तावित अलाईनमेंटनुसार कमीत कमी वृक्षतोड होईल अथवा पुनर्रोपण करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. हा प्रकल्प नाशिककरांच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असून, महानगरपालिका याच्या वेगवान आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आयुक्त मनिषा खत्री यांनी केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधिक्षक अभियंता रविंद्र धारणकर, अधिक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता संजय आडेसरा, कार्यकारी अभियंता शैलेंद्र जाधव, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महत्त्वाचे स्थळांचे निरीक्षण:

यावेळी गंगापुर येथील 11.5 द.ल.लि. क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. तसेच सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 साठी प्रस्तावित वाहनतळ, वसंत कानेटकर उद्यान, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र आणि बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचाही पाहणी दौरात आढावा घेण्यात आला.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने