Nashik : जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उदघाटन


ब्युरो टीम : जलसंपदा विभागातर्फे आजपासून सुरू झालेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उदघाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुबोध मोरे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, वाघाड उपसा सिंचन योजनेचे संचालक गोवर्धन कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध नद्यांतून आणलेल्या जलाचे पूजन करण्यात आले. तसेच जल प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

आमदार फरांदे म्हणाल्या की, 'जलव्यवस्थापन महत्वाचा विषय आहे. या पंधरवड्यात विविध उपक्रम राबवीत नागरिकांना पाण्याचे महत्व सांगावे. राज्य शासनातर्फे सिंचनासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात पाहावयास मिळतील. जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता मुबलक आहे. पाणी वितरणाचे व्यवस्थापन करून गळती रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी उपाययोजना कराव्यात. नाशिक शहर व जिल्ह्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे आगामी २० वर्षांचे नियोजन करावे. तसेच जल प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात,' असेही त्यांनी सांगितले.

अधीक्षक अभियंता मोरे म्हणाले की, 'जलजीवन मिशन हा सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जलसंपदा विभागाचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी जलवाहिनीचा उपयोग केला जातो. श्रीमती फडोळ यांनी सांगितले की, पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर अनुषंगिक उपाययोजना करतानाच जल व्यवस्थापनासाठी नियोजन करण्यात येईल कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

अधीक्षक अभियंता गोवर्धने यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पाण्याचा उपयोग, पाण्याचा काटकसरीने वापर, जल प्रदूषण थांबविणे याविषयी मार्गदर्शन केले. शहाणे यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने