PCMC : भोसरी येथील शिलाई केंद्रामध्ये महापालिकेच्या वतीने मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण सुरू

ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने भोसरी येथील शिलाई केंद्रामध्ये महिलांसाठी १७ मार्चपासून मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे एका बॅचमध्ये सरासरी ३० ते ३५ महिला प्रशिक्षण घेत आहेत. तसेच नुकत्याच दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींसह विविध वयोगटातील महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना हाय स्पीड मशीन, पिकोफॉल मशीन, ओव्हर लॉक मशीन, एम्ब्रोईडरी मशीन, स्टीम आयर्न, इलेक्ट्रिक कटिंग मशीन इत्यादी आधुनिक यंत्रसामग्री वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच डिझायनर ड्रेस, ब्लाऊज, स्कर्ट, फ्रॉक, वन पीस, घागरा, आरी वर्क, एम्ब्रोईडरी, फॅब्रिक पेंटिंग, बांधणी बाटिक वर्क अशा विविध कौशल्यांवर भर दिला जात आहे.

महिलांना स्वतः शिवलेल्या कपड्यांची जाहिरात व विक्री करता यावी यासाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण (इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअँप) देखील दिले जात आहे. त्याचप्रमाणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता, विक्रीसाठी बाजारपेठ यासंदर्भात पाहणी दौऱ्यांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. 

प्रशिक्षणासाठी विशेष प्रशिक्षकांची नेमणूक

फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण महिलांना देण्यासाठी विशेष प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही कोरोना महामारीच्या काळात 'उमेद जागर' प्रकल्पातील महिलांना यशस्वीरित्या शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सध्या या प्रशिक्षकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू आणि इच्छुक महिलांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे. 

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी फॅशन डिझायनिंगसारखे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. महिलांनी स्वयंरोजगारातून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीच्या शिवणकामाचे प्रशिक्षण घेतल्यास बाजारपेठेत जास्त मागणी असलेल्या गोष्टी तयार करण्याचे कसब महिलांमध्ये विकसित होण्यास देखील मदत होणार आहे. 

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याच्या दिशेने महानगरपालिकेचा हा प्रयत्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक यंत्रसामग्री, डिजीटल मार्केटिंग, व्यावसायिक मार्गदर्शन आणि फील्ड व्हिजिट यामुळे महिलांना फॅशन डिझायनिंग व्यवसायात यश मिळवण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी दिल्या जातील. जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

पारंपारिक शिवणकामापेक्षा बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण महिलांना देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या शिवणकामावर भर देऊन उत्पादनाची गुणवत्ता अधिकाधिक वाढविण्यावरही याद्वारे भर दिला जात आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्वाकांक्षी उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. 

- तानाजी नरळे, सहाय्यक आयुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अधिक माहितीसाठी संपर्क -

शिलाई केंद्राचा पत्ता : गव्हाणे वस्ती, पीसीएमसी बस स्टॉप समोर, बहुउद्देशीय बिल्डिंग, तिसरा मजला, भोसरी.

स्मिता अंकुशे (प्रशिक्षक) - ९८५०२९९८२६

शीतल दरंदले (प्रशिक्षक) - ९८९०४९५५९०

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने