PCMC : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या संकेतस्थळासाठी हॅकेथॉन स्पर्धा

ब्युरो टीम : राज्य शासनाच्या १०० दिवसीय उपक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून येत्या ८ आणि ९ एप्रिल रोजी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या हॅकेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाचे दर पाच वर्षांनी नुतनीकरण करण्यात येते. याआधी २०१७ साली संकेतस्थळाचे नुतनीकरण करण्यात आले होते. आता सध्या तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होणारे बदल तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्यांचा अंतर्भाव करून संकेतस्थळाची रचना करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान करण्यासाठी आणि नागरिकांनी सुलभरित्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. येत्या १५ एप्रिल रोजी या संकेतस्थळाचे अनावरण करण्याचे नियोजन आहे.

या नव्याने विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळामध्ये नागरिकांना काही बदल हवे असतील किंवा त्यात काही त्रुटी असतील त्या शोधून काढण्यासाठी हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळामध्ये हवे असलेले तांत्रिक बदल, त्यांची मते, अभिप्राय मांडता येणार आहे. शिवाय महत्वपुर्ण त्रुटी, नवीन संकल्पना किंवा सायबर सुरक्षा आदींबाबत अभिप्राय सुचविणाऱ्या स्पर्धकास बक्षिस देखील देण्यात येणार आहे. 

स्पर्धेचे स्वरूप  

८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते ९ एप्रिल २०२५ दुपारी १२ वाजेपर्यंत नागरिक ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतात सहभाग

४ मार्चपासून नागरिक https://fxurl.co/o5gR4 या लिंकच्या आधारे करू शकतात नोंदणी

स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना सहभाग प्रमाणपत्र (ई-सर्टिफिकेट) देण्यात येणार

प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना देण्यात येणार अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे बक्षिस आणि प्रमाणपत्र

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्याने विकसित संकेतस्थळाचा नागरिकांना अधिक चांगला उपयोग करता यावा, तसेच त्यामध्ये आवश्यक सुधारणा करता याव्यात, यासाठी हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढेल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुलभ व सुरक्षित प्रशासकीय सेवा प्रदान करण्यास मदत होईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे.

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अधिक माहितीसाठी - 

ईमेल -  pcmc.hackathon@pcmcindia.gov.in

संपर्क क्रमांक -  ७०२०३७८०७२, ८६६९६६१२१९

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने