ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड शहरातील नळजोडणीवर अनधिकृतपणे थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० विद्युत पंप धारकांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार कारवाई करण्यात आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या सूचनेनुसार नळजोडणीवर अनधिकृत विद्युत पंप जोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
शहरातील ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंचवड, बळवंतनगर, शिवनगरी, साईराज कॉलनी, ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रहाटणी परिसरातील अमृतवेल कॉलनी, फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्री कुंज कॉलनी, सांगवी परीसरातील गणेशनगर, राजारामनगर, समतानगर, पवनानगर तसेच दापोडी परिसरातील गुलाबनगर, पवार वस्ती एसएमएस कॉलनी, नव भारत नगर या परिसरात पाणी पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे मनपाच्या नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडल्यास उंच भागात पाणी कमी दाबाने पोहोचत आहे आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार, मनपाच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा कठोर कारवाई करीत आहे.
चिंचवड मधील बळवंतनगर, शिवनगरी, साईराज कॉलनी परिसरातील अनधिकृत पणे थेट नळाला जोडलेले २१ विद्युत पंपांचे संच पाणी पुरवठा व ब क्षेत्रीय कार्यालयामार्फत जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी उपअभियंता प्रविण धुमाळ, कनिष्ठ अभियंता ऋषिकेश गेंगजे , रघुनाथ शेमले, तुषार सव्वासे, साधना ठोंबरे, स्था. अभि. सहाय्यक मदन फंड उपस्थित होते.
ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रहाटणी परिसरातील अमृतवेल कॉलनी भागात थेट नळाला जोडलेले ११ विद्युत पंप पाणीपुरवठा विभाग ग क्षेत्रिय कार्यालय मार्फत जप्त करण्यात आले. तसेच १ इंचाचे १ अनधिकृत नळजोड बंद करण्यात आले. कनिष्ठ अभियंता समिक्षा मालपुरे यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर आणि कर्मचारी यांनी कारवाई केली आहे.
फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्री कुंज कॉलनी भागात थेट नळाला जोडलेले १० विद्युत पंप पाणीपुरवठा विभाग फ क्षेत्रिय कार्यालय मार्फत जप्त करण्यात आले . ही कारवाई कनिष्ठ अभियंता सचिन लोणे व ओम इंगोले व त्यांच्या पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर आणि कर्मचारी यांनी केली आहे.
सांगवी परीसरातील गणेशनगर, राजारामनगर, समतानगर, पवनानगर तसेच दापोडी परिसरातील गुलाबनगर, पवार वस्ती एसएमएस कॉलनी, नव भारत नगर येथील १८ अनधिकृत विद्युत पंप जप्त करण्यात आले. यावेळी उपभियांता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता सागर पाटील, संदीप ढेपले, सोनाली खेमनर, अभियांत्रिकी सहाय्यक प्रतीक्षा बढीये, अजय मखारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी पाणी जपून वापरावे. तसेच नळजोडणीला अनधिकृत पद्धतीने मोटार जोडून पाणी उपसा करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जाऊन वापरा व अनधिकृत पद्धतीने पाण्याचा अपव्यय करू नका. अन्यथा महानगरपालिकेच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.
-प्रदीप जांभळे पाटील , अतिरिक्त आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना आवश्यक पाणी पुरवठा करत आहे. अनधिकृत विद्युत पंप जोडणीमुळे पाणी पुरवठा करण्यास अडथळा येत आहे. यामुळे नळ जोडणीवर अनधिकृत पद्धतीने विद्युत पंप जोडणाऱ्यावर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
- अजय सूर्यवंशी , सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा