PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला “महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” पुरस्कार


ब्युरो टीम : जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोमवारी (७ एप्रिल) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे झालेल्या “महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” या राज्यस्तरीय कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचा दोन पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. ऋतुजा लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, डॉ. संध्या भोईर, यशस्विता बाणखेले (पी.एच.एन) यांनी हा सन्मान स्वीकारला.

“महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” या कार्य़क्रमात सार्वजनिक आरोग्य विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा, महानगरपालिकांचा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा व रुग्णालयांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला दोन पारितोषिके मिळाली आहेत.

‘राज्यातील सर्वाधिक प्रसूती करणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र’ या श्रेणीत कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय आकुर्डी या रुग्णालयाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी (MOH Ranking) या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला आहे. या पुरस्कारासाठी वर्षभरात रुग्णालयांद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम यांचा सविस्तर विचार करून आणि मूल्यमापन करून आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची क्रमवारी निश्चित करण्यात आली होती.

या कार्यक्रमात राज्यभरातील जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका यांसह एकूण ५१ बक्षिसे प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकांपैकी फक्त ५ महानगरपालिकांना एकूण ६ पारितोषिके मिळाली असून त्यापैकी २ पारितोषिके पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाली आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला राज्यस्तरावर दोन पुरस्कार मिळाले असून हा सन्मान पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांचा आहे. महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कामाचा हा सन्मान आहे. आगामी काळातही पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील.

- शेखर सिंह. आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

‘महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५’ मध्ये मिळालेले पुरस्कार म्हणजे महानगरपालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेत कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचे आणि कर्मचाऱ्यांचे यश आहे. आधुनिक तंत्रज्ञान, डेटा-आधारित कामकाज आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन यामुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यास महानगरपालिका प्रयत्नशील असून राज्यस्तरावर मिळालेले पुरस्कार या कामासाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत.

-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेची वैद्यकीय आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करत आहोत. महानगरपालिकेला मिळालेला पुरस्कार आमच्या आरोग्य विभागाने केलेल्या कामाला प्रोत्साहन देणारा आहे. यापुढेही नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यादृष्टिने आम्ही नियोजन करीत आहोत.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने