Sangli : सर्वांसाठी विमा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रीय योगदान द्या, जिल्हाधिकारी अशोक काकडे


ब्युरो टीम : सर्व लोकांना विम्याच्या संरक्षणात आणण्यासाठी, राज्य विमा आराखड्यांतर्गत “सर्वांसाठी विमा” ही योजना राबविण्यासाठी व यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपले सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात सर्वांसाठी विमा योजना जिल्हास्तरीय समिती आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, सरकारी कामगार अधिकारी दिनेश पाटोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, टाटा एआयजी चे व्हाईस प्रेसिडंट क्रांती मरिन, वरिष्ठ मॅनेंजर गोपाळ सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, इन्शुरन्स कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सामान्य लोकांमध्ये विमा जागरूकता वाढवण्यासाठी आवश्यक नेटवर्क तयार करण्याकामी सर्व आयआरडीए नोंदणीकृत जीवन आणि सामान्य विमा कंपन्यांना शासकीय यंत्रणेकडून आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करावी. ग्रामपंचायत स्तरावर, ग्रामपंचायत प्रमुख आणि बचत गटाच्या सदस्यांना विम्याचे महत्व आणि प्रधानमंत्री जीवनज्योती विमा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना आणि जीवन विमा घटकासह इतर बचत आणि गुंतवणूक उत्पादन यासारख्या विविध सरकारी विमा योजनांबाबत प्रोत्साहन प्रशिक्षणाचे नियोजन करण्याकामी सर्व आयआरडीए नोंदणीकृत विमा कंपन्याचे प्रतिनिधी यांना मदत करावी.

महिला व बाल विकास विभागाच्या मदतीने अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना विम्याचे महत्व आणि विविध सरकारी विमा योजना समजून घेण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन करण्यासाठी इन्शुरन्स कंपन्यांना सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिले.

प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांनी स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सव 2047 या वर्षापर्यंत सर्व लोकांना विम्याच्या संरक्षणात आणण्याचा व राज्य विमा आराखड्याअंतर्गत सर्वांसाठी विमा ही योजना राबविण्यासाठी व यशस्वी अंमलबजावणी करण्याकामी महाराष्ट्र राज्यासाठी लीड इन्शुरर्स म्हणून आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. तथा टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांची नामनियुक्ती केली असल्याचे सांगितले. ही कंपनी आणि सर्व आयआरडीएआय नोंदणीकृत नॉन-लाईफ आणि लाईफ इन्शुरन्स कंपन्या राज्य विमा योजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सामान्य लोकांमध्ये विमा जागरूकता वाढविण्यासाठी आवश्यक नेटवर्क तयार करणार असल्याची व योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने