Sangli :शासकीय स्तरावर उद्योजकांना सर्वोतोपरी मदत करू, जिल्हाधिकारी अशोक काकडे


ब्युरो टीम : शासकीय स्तरावर उद्योजकांना सर्वोतोपरी मदत करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. 

उद्योग संचालनालय, मैत्री आणि जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या वतीने हॉटेल ककून सांगली येथे गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. या परिषदेस उद्योग विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक एस. जी. रजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी. एम.आय.डी.सी. च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, सांगली मिरज मॅन्यु. असोसिएशनचे विनोद पाटील, कृष्णा व्हॅली असोसिएशनचे रमेश आरवाडे, मैत्रीच्या नोडल अधिकारी डॉ. प्रियदर्शनी सोनार, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी  यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या परिषदेत नव उद्योजकांना उद्योग करणे कसे महत्वाचे आहे हे उदाहरणांव्दारे पटवून दिले. उद्योजकांनी जिल्ह्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करून रोजगार निर्मितीव्दारे जिल्ह्याच्या विकासाला चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सांगली जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता तथा जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे करण्यात आले होते. सांगली येथे झालेल्या गुंतवणूक शिखर परिषदेत विविध कंपन्यांशी 149 करार झाले यातून जिल्ह्यात आगामी काळात 3480 कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे 6 हजार 344 युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे,  जिल्ह्याची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरीता गुंतवणुक आकर्षित करणे, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या  जिल्हास्तरीय गुंतवणुक परिषदेचा उद्देश यशस्वी झाला. 

यावेळी महाव्यवस्थापिका  विद्या कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून परिषदेचा उद्देश सांगितला. मागील वर्षी उद्योग घटकांशी झालेल्या 61 सामंजस्य करारामधील 51 उद्योग घटक उत्पादनात गेल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली मिरज मॅन्यु. असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी उद्योग करत असताना येणाऱ्या विविध अडचणी मांडल्या. 

या परिषदेमध्ये धोरणात्मक निर्णय गुंतवणूक संधी आणि राज्यातील औद्योगिक विकासावर चर्चा करण्यात आली. स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांच्या आर्थिक क्षमतेवर भर देण्यात आला असून त्यात महत्वपूर्ण गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या उद्दिष्टांचा भर असल्याचे श्री. रजपूत यांनी सांगितले.  त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र सांगली टीमचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे 100 टक्के लक्ष्यांक राज्यात सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देवून महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. 

गुंतवणूक करार करणाऱ्या प्रमुख कंपन्या - द सुप्रीम इंडस्ट्रीज लिमीटेड-५६० कोटींची गुंतवणूक, ११२० रोजगार निर्मिती, आष्टा लायनर्स प्रा.लि.-१२५ कोटी गुंतवणूक, ३०० रोजगार निर्मिती, कस्तुरी फाउंड्री प्रा. लि.- १३५ कोटी गुंतवणूक, ३०० रोजगार निर्मिती, परिवार बेकर्स-६८ कोटी गुंतवणूक, १३६ रोजगार निर्मिती, विरेशा कास्टींग्ज् प्रा.लि.-३० कोटी गुंतवणूक, ६० रोजगार निर्मिती, शाह लागू प्रॉपर्टीज १०० कोटींची गुंतवणूक, २०० रोजगार निर्मिती, 

यावेळी मैत्री पोर्टल बाबत नोडल अधिकारी डॉ. प्रियदर्शनी सोनार, सिडबी या संस्थेचे सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमामध्ये महत्व यासंदर्भात एस. एल. शिनू, उद्योजकता कर्ज व डिजीटल लोन बाबत कांचन कुलकर्णी, रॅम्प प्रकल्पाबाबत अमेय मिसाळ, सुलमउ बाबत वेगवेगळ्या योजना तसेच औद्योगिक विमा बाबत न्यु इंडीया अशुरन्सचे अख्तर हुसेन बोरगावे, सध्याच्या सांगली जिल्ह्याच्या निर्यातीविषयी श्रीजीत नायर आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या परिषदेत शेवटच्या टप्प्यात प्रश्नोत्तरे व शंका निरसन करण्यात आले. यावेळी उद्योजकांच्या प्रश्नांना उद्योग सहसंचालक श्री. रजपूत व मैत्री च्या सल्लागार श्रीमती निधी शेटटी यांनी उत्तरे दिली. 

या परिषदेमध्ये जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूकीविषयी चर्चा करण्यात आली. या परिषदेस ३१८ पेक्षा जास्त  उद्योजक उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने