Sangli : पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक, पोलीस अधीक्षक संदीप घुगे


ब्युरो टीम : कृत्रिम बुध्दिमत्ता या नवीन तंत्रज्ञानाचा वापर योग्य पध्दतीने केला तर कोणत्याही गोष्टीत कमीत कमी संसाधने वापरून जास्तीत जास्त परिणाम देऊ शकतो. आगामी काळात जलसंपदा विभागाने याचा अंगिकार केल्यास प्रगती होईल. पर ड्रॉप मोअर क्रॉप (Per drop more crop) हे शासनाचे धोरण आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले.

वारणाली, सांगली येथे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. आजगेकर, भूजल सर्वेक्षणच्या वरिष्ठ भू-वैज्ञानिक सुजाता सावळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष श्री. कोल्हे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी, पिण्यासाठी उद्योगासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था केली जाते. पोलीस आस्थापनेमध्ये कोठेही पाण्याचा अपव्यय, अतिरिक्त वापर होऊ नये, यासाठी आम्हीही प्रयत्न करीत आहोत. ही बाब प्रत्येकाने आपल्या जवळच्या, सभोवतालच्या व्यक्तींना समजून सांगणे गरजेचे आहे. तरच आगामी काळामध्ये कोठेही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होणार नाही, असे ते म्हणाले.

 जलसंपदा विभागास ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची आवश्यकता लागेल त्या ठिकाणी पोलीस विभाग आपल्या पाठीशी उभा आहे असे सांगून पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले,  कोणी कामामध्ये अडथळा आणत असेल किंवा पाणी चोरीचा प्रकार होत असल्यास तात्काळ सांगावे, त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करू. काम करताना अडचण निर्माण होणार नाही यासाठी सदैव तत्पर राहू. सन 2024 मान्सून मध्ये सांगली पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरण प्राधिकरणाशी पाणी विसर्गाबाबत चांगला समन्वय, नियोजन केल्यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती उद्‌भवली नाही. यावर्षीही त्याच पध्दतीने नियोजन करावे, असे ते यावेळी म्हणाले.

कार्यकारी अभियंता एम. एम. रासनकर यांनी मनोगतात पाण्याचे महत्त्व ‍विषद करून पाण्याचा वापर काटकसरीने करावा,‍ जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी मनोगतात व्यक्त करताना कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिनांक 15 ते 30 एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यासाठी ‍सिंचनाचा इतिहास पाहिला तर ब्रिटिशकालीन कृष्णा कालव्यापासून सुरूवात झाली. साधारणत: 152 वर्षापूर्वी कृष्णा कालवा ‍निर्माण झाला, त्याचा आजही उपयोग होत आहे. ताकारी सिंचन योजनेची प्रथमत: 1983 साली सुरूवात झाली, त्यानंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची 1984 साली सुरूवात झाली व टेंभू योजना 1996 साली सुरू झाली. पूर्वीच्या म्हैसाळ योजनेत वाढ होत गेली व 2023 साली ताकारी व म्हैसाळ प्रकल्प पूर्ण करून जवळपास 1 लाख 9 हजार 127 हेक्टर ‍सिंचन ‍निर्मिती केली असल्याचे ते म्हणाले.

टेंभू योजना डिसेंबर 2023 ला पूर्ण होवून त्याचे सिंचन क्षेत्र जवळपास 80 हजार हेक्टर निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागांतर्गत ‍तिन्ही योजना मिळून गेल्या वर्षी विक्रमी पाणी उचलले गेले आहे. जवळपास 50 टीएमसी पाणी उचलून साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र सिंचित केले आहे. सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील तलाव भरण्यात आले. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी जलसंपदा विभाग सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे  म्हणाले.

प्रारंभी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सिंचन लाभक्षेत्र नकाशाची पाहणी केली. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सूत्रसंचालन जलसंपदा विभागाच्या संगीता मोरे यांनी केले, आभार कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी मानले. कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने