Sangli : सांगलीत सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


ब्युरो टीम :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दि. 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सांगली जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'सामाजिक समता सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय भवन, सांगली येथे या सप्ताहाचे उदघाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा प्रतिभा इंगळे, सदस्य नागनाथ चौगुले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, बहुजन कल्याण कार्यालयाच्या सहायक संचालक धनश्री भांबुरे, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी चे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका वाचन करुन जनजागृती केली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनासंबंधी घडलेले विविध प्रसंग सभागृहासमोर मांडले व समाजाने त्यातून समाजोपयोगी कार्याचा बोध घ्यावा असे सांगितले. सामाजिक समता सप्ताहअंतर्गत यापुढील होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, सर्व नागरिकांनी, सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सामाजिक समता सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी यावेळी दिली.

दिनांक 9 एप्रिल रोजी जिल्ह्यातील महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अंधश्रध्दा निर्मुलनाविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.10 एप्रिल रोजी समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार आहे. 'मार्जिन मनी' योजनेतंर्गत कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे.

दि. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे व व्याख्याने, दि. 12 एप्रिल रोजी संविधान जागर व संविधान जनजागृतीसाठी कार्यक्रम, दि. 13 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व महिला मेळावा, जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्यासह सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह येथे रक्तदान शिबीराचे आयोजन, दि. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त शासकीय कार्यालये, महाविद्यालय, आश्रमशाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करणे व इतर कार्यक्रम, व्याख्याने, चर्चा सत्रे व सामाजिक समता सप्ताहाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती  सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने