Shirdi Crime : पोलिसांनी असे पकडले काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपी

विक्रम बनकर, अहिल्यानगर : शिर्डी जवळील काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेकडून बारा तासाच्या आत या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

४ एप्रिल २०२५ रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले(रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी, ता.राहाता) यांच्या राहते घरी अज्ञात आरोपीतांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हत्यारांनी  कृष्णा साहेबराव भोसले (वय ३०) आणि साहेबराव पोपट भोसले (वय ६०) यांना जीवे ठार मारून तसेच साकरबाई साहेबराव भोसले (वय ५५ सर्व रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी, ता.राहाता)  यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला. याबाबत राहाता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काकडी, ता.राहाता येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सूचना देऊन समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले. 

नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालींदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशांचे तीन पथक तयार करून, पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.  

पथकाने असा घेतला शोध

५ एप्रिल २०२५ रोजी तपास पथके तांत्रीक विश्लेषण व बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयीत इसम हे टेम्पोमधुन सिन्नर मार्गे नाशिककडे जात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका, सिन्नर, जि.नाशिक येथे सापळा रचुन संशयीत इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजुस बसलेले संशयीत दोन इसम संदीप रामदास दहाबाड (वय १८), जगन काशिनाथ किरकिरे ( वय २५, दोन्ही रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर) यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन - तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावडयाने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असलेबाबत माहिती सांगितली . ताब्यात घेण्यात आरोपी संदीप रामदास दहाबाड (वय १८), जगन काशिनाथ किरकिरे ( वय २५ दोन्ही रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर) यांना गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहाता पोलीस ठाणे हे करीत आहे. तपास पथकास संशयीत आरोपीतांचा शोध घेणेकामी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी मदत केली आहे. 

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने